आगर बालोद्यानात असामाजिक तत्वांची वर्दळ; पालकांमध्ये भीती, नागरिकांमध्ये रोष
डहाणू नगरपरिषदेकडून आगर परिसरात लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेले बालोद्यान सध्या दुर्लक्षामुळे वेगळ्याच स्वरूपात बदलत चालले आहे. मुलांच्या खेळण्यासाठी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी निर्माण केलेले हे उद्यान आता मद्यपी व प्रेमी युगुलांच्या अड्ड्यात रूपांतर होत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे.
उद्यान परिसरात रिकामे बिअरचे डबे, प्लास्टिक कचरा सहज दिसतो. यामुळे येथे मद्यपान चालते हे स्पष्ट होते. धूम्रपान करणारे युवक गटागटाने तासनतास थांबतात. तसेच, गांजाचे सेवन होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिवाय, अपुऱ्या प्रकाशाचा फायदा घेत आडोश्याला प्रेमी युगुल चाळे करताना दिसत असून, परिणामी हे बालोद्यान मुलांसाठी धोकादायक आणि असुरक्षित ठरत आहे. मुलांना येथे आणताना भीती वाटत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे. नगरपरिषदेकडून उद्यानाच्या देखभालीकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात येत आहे. सुरक्षारक्षकांचा अभाव, अपुरा प्रकाश आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याने असामाजिक घटकांना येथे मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे उद्यानाचा मूळ उद्देश धोक्यात आला आहे. याबाबत नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत नगरपरिषदेकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
उद्यान परिसरात पुरेसा प्रकाश, सीसीटिव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षकांची नेमणूक करून सतत निगराणी ठेवावी आणि मद्यपान, धूम्रपान तसेच अनुचित प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम भूमिका नागरिकांनी मांडली आहे. आगर बालोद्यानाचे वाढते असुरक्षित वातावरण पाहता, नगरपरिषद नागरिकांच्या या तक्रारी गांभीर्याने घेऊन ठोस पावले उचलणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




Post a Comment
0 Comments