मुंबई–वडोदरा नव्या द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात; चालक ठार, पाच प्रवासी जखमी
डहाणू : जितेंद्र टोके
डहाणू तालुक्यातील गंजाड कोहराली पाडा परिसरात मुंबई–वडोदरा नव्या द्रुतगती महामार्गावर सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणारी इको कार लोखंडी दुभाजकावर जोरात आदळली. या भीषण धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत.
संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चालक बच्चू बाबू मासमार (रा. चरी कोटबी) याचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते. त्यापैकी महेंद्र सुभाष आहडी गंभीर जखमी झाला असून त्याच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. त्याच्यावर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. उर्वरित चौघांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना डहाणू उप जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले. हे सर्वजण चरी कोटबी गावातील रहिवाशी असून घरी परतत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, नव्या द्रुतगती महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही या मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.


Post a Comment
0 Comments