आदिवासी शेतकऱ्यांच्या भूमोबदल्यासाठी अस्मिता पार्टीचे आदिवासी मंत्र्यांकडे निवेदन सादर
डहाणू : कासा ते संजाण दरम्यानच्या राज्य मार्ग क्रमांक ७३(SH-73) वरील रस्ते रुंदीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू असून या राज्य महामार्गाच्या विस्तारामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये गेल्याने निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा आणि प्रभावित शेतकऱ्यांना तातडीने योग्य भूमोबदला मिळावा, या मागणीसाठी भारतीय अस्मिता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार, दि.१८ नोव्हेंबर रोजी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची मुंबईतील लोहगड निवास येथे भेट घेऊन निवेदन सादर केले.
कासा ते संजाण राज्यमार्ग क्रमांक ७३ कासा, वाघाडी, चरी पावन, धरमपूर, बापूगाव, भूजाडी, बांधघर, गांगोडी, सायवन, उधवा, तलासरी या परिसरातून जात असल्याने अनेक आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. शेतीक्षेत्राचा मोठा भाग रस्त्याच्या कामात गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना योग्य आणि कायदेशीर भूमोबदला व नियोजबद्ध काम व्हावे यासाठी मुंबईतील लोहगड निवास येथे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना भारतीय अस्मिता पार्टीकडून निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित सर्व गावांमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, भूमीमापन आणि भूमोबदल्याची प्रक्रिया जलद गतीने पार पाडावी, तसेच रस्त्यामुळे बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला योग्य नुकसानभरपाई दिली जावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन स्विकारताना मंत्री डॉ. उईके यांनी विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे उपस्थितांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी योग्य भूमोबदला मिळावा आणि त्यांच्या उपजीविकेवर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी पक्षाचे पदाधिकारी पुढील टप्प्यांमध्येही पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. निवेदन देण्यासाठी भारतीय अस्मिता पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष विलास वांगड, अतुल जाधव, गोपाळ भगत, मिथुन सावर, जानू वळवी, सुरेश झिरवा उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेऊन मंत्र्यांसमोर विषय मांडला.


Post a Comment
0 Comments