काशिनाथ चौधरींच्या भाजप पक्षप्रवेशानंतर काही तासांतच स्थगिती; डहाणूच्या राजकारणात खळबळ
डहाणू : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. २० एप्रिल २०२० मध्ये गडचिंचले येथे घडलेल्या साधू हत्याकांडाच्या सावटाखाली अनेक वर्षांनी पुन्हा एकदा या प्रकरणाने राजकारणात धुराळा उडवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र गट) तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती ॲड. काशिनाथ चौधरी यांनी १६ नोव्हेंबर रोजी भाजपमध्ये केलेल्या गाजलेल्या पक्षप्रवेशानंतर केवळ काही तासांतच परिस्थितीत नाट्यमय कलाटणी झाली.
रविवार, १६ नोव्हेंबर रोजी डहाणूतील रामवाडी येथे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या नेतृत्वात खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये, बाबाजी काठोळे, प्रकाश निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत काशिनाथ चौधरी यांचा मोठ्या थाटात पक्षप्रवेश झाला. या कार्यक्रमात चौधरींसोबत तब्बल ३ ते ४ हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय समीकरणेच बदलली. या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला (शरदचंद्र गट) मोठा धक्का बसल्याचे स्थानिक राजकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले. सामाजिक माध्यमांवर चौधरींच्या प्रवेशानंतर तुफान चर्चा सुरू झाल्या आणि भाजपवर विविध स्तरांतून आरोपांची मालिका सुरू झाली. साधू हत्याकांडानंतर भाजपनेच चौधरींवर गंभीर आरोप केले होते. मात्र, आज त्यांनाच पक्षात प्रवेश देण्यात आल्याने कालचे आरोप आज पुसले का? असा सवाल जनमानसात आणि सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला. यामुळे पक्षांतर्गतही अस्वस्थता निर्माण झाली. या वातावरणाचा परिणाम म्हणून १७ नोव्हेंबर २०२५ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून एक अधिकृत पत्र जारी करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस (संघटन) रविंद्र चव्हाण यांनी पाठवलेल्या या पत्रात लिहिले, साधू हत्याकांडाशी संबंधित चर्चा पुन्हा माध्यमांमध्ये उफाळून आल्याने परिस्थिती संवेदनशील झाली आहे. स्थानिक पातळीवरील प्राथमिक माहितीच्या आधारे प्रवेश देण्यात आला होता. परंतु, प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता काशिनाथ चौधरी यांच्या प्रवेशास तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे. हे पत्र सार्वजनिक झाल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड राजकीय खळबळ उडाली. निवडणुकीच्या तोंडावर अचानक घडलेल्या या घडामोडीमुळे भाजपमधील अंतर्गत संवाद, निर्णय प्रक्रियेतील समन्वय आणि गोटबाजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
डहाणूच्या राजकारणातील घडामोडींमध्ये काशिनाथ चौधरी हे अनेक वर्षांपासून “पक्का खेडाळू” म्हणून ओळखले जातात. रणनीती, समीकरणे आणि बाजी कशी पलटी करायची यातील त्यांची हातोटी नेहमीच बोलली जात असे. मात्र, या वेळी त्यांनी केलेली चाल उलटी पडल्याची चर्चा गल्लीबोळातून सुरू झाली आहे. पक्षप्रवेशाचा मोठा शो, समर्थकांच्या गर्दीची ताकद आणि लगेचच त्याच पक्षाकडून मिळालेली स्थगिती, या संपूर्ण प्रकारामुळे चौधरींच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मानले जात आहे. डहाणू नगरपरिषद निवडणुकीच्या घडामोडींनी वातावरण तापवले आहे. भाजपमध्ये नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे, राष्ट्रवादीत आनंदाची लहर पसरली आहे, तर जनतेत या राजकीय सर्कशीमुळे कुतूहल वाढले आहे. आता पुढील काही दिवसांत चौधरींची भूमिका काय असेल, भाजप स्थानिक नेतृत्वाचा पुढील निर्णय काय असेल आणि विरोधक याचा कसा फायदा घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डहाणूच्या राजकारणाला वेगळीच दिशा देणारी ही घटना येणाऱ्या निवडणुकीचा रंग बदलणार इतकी महत्त्वाची ठरत आहे.




Post a Comment
0 Comments