Type Here to Get Search Results !

चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलाकांचे आगमन

चंद्रसागर खाडीत तीन वर्षांनंतर पुन्हा चित्रबलाकांचे आगमन


डहाणू : जितेंद्र टोके 



डहाणू तालुक्यातील चंद्रसागर खाडी पुन्हा एकदा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून आली आहे. तब्बल तीन वर्षांनंतर करकोच्यांच्या दुर्मिळ प्रजातीतील चित्रबलाक, ज्याला चामढोक किंवा पेंटेड स्टॉर्क असेही म्हटले जाते, हे पक्षी येथे दिसून आले आहेत. खाडीत मातीचा भराव टाकल्याने नष्ट होऊ लागलेली जैवविविधता आणि पक्ष्यांचा विसरलेला वावर, पर्यावरणप्रेमींच्या प्रयत्नांमुळे पुन्हा खुलला आहे.



या संघर्षात संवेदनशील नागरिक संगीता कडू यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी २०२३ साली मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ३ एप्रिल २०२५ रोजी दिलेल्या आदेशात खाडीतील बेकायदा भराव तसेच खारफुटीचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर परिस्थिती पूर्ववत करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कार्यवाही केली आणि खाडीतील नऊ ठिकाणी बांध फोडून भराव हटवला. त्यामुळे खाडीला पुन्हा श्वास मिळाला आणि परिसंस्था पोषक वातावरण निर्माण झाले. या सकारात्मक बदलाचा परिणाम म्हणजे चित्रबलाक या पक्ष्यांचे आगमन, यामुळे अन्य पाणथळ पक्षीही परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाइल्डकेअरचे स्वयंसेवक सागर पटेल आणि छायाचित्रकार समीर भालेरकर यांनी या दुर्मिळ पक्ष्यांचे खाडीत टिपलेले छायाचित्र विशेष ठरले आहे. चंद्रसागर खाडीतील हे दृश्य स्थानिकांसाठी आनंदाची बातमी ठरत असून, जैवविविधता संवर्धनासाठी झालेल्या संघर्षाचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.





Post a Comment

0 Comments