वाणगाव येथे गौरी पूजन उत्सव जल्लोषात
डहाणू : जितेंद्र टोके
वाणगाव येथे शिवसेना, युवा एल्गार आघाडी व झलकारीबाई महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपारिक गौरी (गवुर) पूजन उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रचंड जनसमुदायाने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजात गौरी पूजनाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. विवाहित महिला जंगलातील इंदवी फुलाचे पूजन करून घरात लाल मातीने सारवून तांदळाच्या पिठाने हाताचे ठसे उमटविण्याची परंपरा पाळतात. त्यानंतर गौरी मातेला नैवेद्य अर्पण करून पूजन केले जाते. या परंपरेतून महिलांचा व तरुणांचा गवुर नृत्य तसेच तारपा नृत्य रंगतो. या कार्यक्रमात बोलताना युवा एल्गार आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व शिवसेना विधानसभा संघटक अँड. विराज गडग यांनी “संस्कृती व परंपरा जपण्यासाठी असे उत्सव महत्त्वाचे आहेत” असे सांगितले. शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी भागातील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच सोबत राहण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार अमित घोडा यांनी गडग यांना सहकार्याचे आश्वासन देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर आदिवासी सेवक पुरस्कार विजेते वसंत भसरा यांनी “परंपरा जपत आदिवासी समाजाने आपल्या हक्कांसाठी एकीने लढले पाहिजे” असे मत व्यक्त केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण व तालुका अध्यक्ष संतोष देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला जिल्हा व तालुका पातळीवरील शिवसेना पदाधिकारी, युवा एल्गार आघाडीचे नेते, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, यूट्यूब कलाकार तसेच परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. झलकारीबाई महिला बचत गटाच्या अध्यक्षा रजनी गडग व महिलांनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. वाणगावसह वणई, वेती, सुर्यानगर, तवा, ओसरविरा, निकणे, ऐना, गोवणे, शिगाव, देदाळे, चिंचणी, साये, वधना, गंजाड, रायतळी, खंबाळे, चंद्रनगर, मुंडवाळी आदी भागातील कार्यकर्ते व समाजबांधवांनी उपस्थित राहून उत्सवाला रंगत आणली. शेवटी अँड. विराज गडग यांनी सर्वांचे आभार मानून गौरी पूजनाच्या शुभेच्छा दिल्या.




Post a Comment
0 Comments