वादळी वाऱ्यामुळे घर जमीनदोस्त; राष्ट्रवादी काँग्रेसकडून वृद्ध महिलेला मदतीचा हात
डहाणू, १६ सप्टेंबर
डहाणू तालुक्यातील आंबिस्ते सुतारपाडा येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामध्ये स्थानिक रहिवासी बायजी भिवा लहांगे या वृद्ध महिलेचे घर पूर्णपणे कोसळून जमीनदोस्त झाले. घराचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने त्या वेळी घरात त्या एकट्याच असल्याने जीवितहानी टळली. मात्र, अचानक निवारा गमावल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला. ही घटना समजताच गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पक्षाच्या आदिवासी सेलचे तालुका अध्यक्ष विलास सुमडा यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला मदत करण्यासाठी पक्षाचे युवा नेते करण ठाकूर यांच्याशी चर्चा करून आर्थिक सहाय्याची व्यवस्था केली. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंबिस्ते सुतारपाडा येथे पोहोचले आणि बायजी लहांगे यांना तातडीची आर्थिक मदत सुपूर्त केली. या मदतकार्यावेळी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या जया दुबळा, सुनीता घोडा, नवश्या काटेला, विकास करमोडा, नितीन धडपा, अजय वायेडा, जानू पिलेना यांच्यासह स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते. ग्रामस्थांनी या मदत कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. वादळ व पावसामुळे ग्रामीण भागात घरे, झोपड्या, शेती व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान होत असताना प्रशासनाबरोबरच सामाजिक संस्था व राजकीय पक्षही तत्परतेने मदतीचा हात पुढे करत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments