Type Here to Get Search Results !

डेहणे गावाजवळ भरधाव कारची मोकाट गुरांना जोरदार धडक

डेहणे गावाजवळ भरधाव कारची मोकाट गुरांना जोरदार धडक; चार गायी ठार, चालक गंभीर जखमी


डहाणू, दि. ९ (प्रतिनिधी): शिवप्रसाद कांबळे 




सोमवारी रात्री नऊच्या सुमारास डहाणूवरून वाणगावच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ब्रेझा कारने (क्रमांक MH48DD4773) डेहणे गावाजवळ रस्त्यावर बसलेल्या मोकाट गुरांच्या कळपाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार गायी जागीच ठार झाल्या तर एक वासरू गंभीर जखमी झाले. अपघातानंतर गौरक्षक प्रवीण व्यास यांनी तातडीने जखमी वासराला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून आशागड येथील गौशाळेत हलवले. अपघातात कारचालक राजेश संखे गंभीर जखमी झाले असून त्याच्यासोबत असलेली आणखी एक व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे. दोघांनाही उपचारासाठी वाणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोरदार धडकेमुळे कारचा समोरील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.



सदर घटनेची माहिती डेहणे ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय भोंडवा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दत्तू दुमाडा यांनी पोलिसांना दिल्यानंतर डहाणू पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी आशागड पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक किर्ती कुमार गायकवाड यांनी वाहनचालकांना रात्रीच्या वेळी मर्यादित वेगाने आणि सावधगिरीने वाहन चालवण्याचे आवाहन केले. अपघाताचा पुढील तपास पोउपनि गायकवाड करत आहेत.



दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. डेहणे परिसरात रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर कायम असल्याने अपघातांची शक्यता वाढते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जनावरांच्या सुरक्षिततेसाठी तसेच वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यापूर्वीही या मार्गावर मोकाट जनावरांमुळे किरकोळ अपघात घडले असल्याचे सांगितले जाते. मात्र चार गायींचा मृत्यू झाल्याने हा अपघात गंभीर ठरला आहे.





Post a Comment

0 Comments