Type Here to Get Search Results !

पालघर पोलिसांची मोठी कामगिरी ; मारहाण करून टेम्पो चोरी करणारा आरोपी जेरबंद, २२ लाखांचा टेम्पो हस्तगत

पालघर पोलिसांची मोठी कामगिरी ; मारहाण करून टेम्पो चोरी करणारा आरोपी जेरबंद, २२ लाखांचा टेम्पो हस्तगत


डहाणू : १७ सप्टेंबर



तलासरी परिसरात मारहाण करून जबरीने आयसर टेम्पो चोरी करणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून तब्बल २२ लाख रुपये किंमतीचा चोरीस गेलेला टेम्पो जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. रविवार, ७ सप्टेंबर रोजी फिर्यादी रामआश्रम मंगु यादव यांना त्यांच्या मालकाने तलासरी येथून साबण भरून चिपळून येथे घेऊन जाण्याचे भाडे असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाडे देणाऱ्या इसमाने रामआश्रम यांना फोन करून बोलावण्यात आल्याने ते चिंचोटी येथे डिझेल भरून तलासरीकडे येत असताना मौजे मनोर येथे फोन करणारे दोन इसम भेटले. त्यांच्यासोबत दापचरी येथील सर्व्हिस रोडवर गेल्यानंतर आरोपींनी टेम्पोच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि रामआश्रम यादव यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून गुजरातकडे नेले. तेथील एका हॉटेलवर जेवणासाठी थांबल्यानंतर अंधाराचा फायदा घेत यादवने निसटून आपल्या मालकाला सर्व प्रकार सांगितला. मालकाने दिलेल्या ठिकाणी शोध घेतला असता टेम्पो न सापडल्या ८ सप्टेंबर रोजी यादव यांनी तलासरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी गुप्त माहिती व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढला. अखेर १५ सप्टेंबर रोजी स्वप्नील मधुकर दुमाडा (रा. उसगाव बंधारा, ता. गणेशपुरी, जि. ठाणे) यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने साथीदारासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला डहाणू न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला आयसर टेम्पो (किंमत २२ लाख रुपये) हस्तगत करण्यात आला असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.


या प्रकरणाचा पुढील तपास पोउनि बबन गावीत करीत आहेत. संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तलासरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड, पोउपनिरीक्षक विकास दरगुडे, बबन गावीत, हिरामण खोटरे तसेच पोलीस कर्मचारी योगेश मुंढे यांच्या पथकाने केली आहे.


Post a Comment

0 Comments