Type Here to Get Search Results !

शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत डहाणूत भव्य मेळावा

शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या उपस्थितीत डहाणूत भव्य मेळावा


स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी धोरण आखणी व पक्ष प्रवेश कार्यक्रम




डहाणू : (दि.०६,सप्टेंबर) शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार डहाणू व तलासरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एका भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा रविवार, दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता डहाणू येथील दशाश्री माळी सभागृह, मसोली येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला शिवसेना उपनेते निलेश सांबरे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.



मेळाव्यात पक्षाच्या आगामी निवडणूकांसाठी सविस्तर धोरण आखणी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसंबंधी चर्चा तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील शिवसेनेचा जनाधार अधिक मजबूत करण्यासाठी हा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचे पक्षाच्या वर्तुळातून सांगण्यात येत आहे. या मेळाव्यात उपनेत्या ज्योतीताई मेहेर, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित, बोईसर विधानसभा आमदार विलास तरे, माजी आमदार अमित घोडा, माजी खासदार श्रीनिवास वणगा, महिला जिल्हा संघटक वैदेही वाढाण यांसह जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कार्यकर्त्यांना निवडणूक लढविण्याची दिशा, स्थानिक समस्या व त्यावरील उपाययोजना, तसेच मतदारांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय, डहाणू व तलासरी तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न, आदिवासी भागातील विकासकामे, शेतकरी व मच्छीमार यांच्या समस्या, रोजगाराच्या संधी, रस्ते व पायाभूत सुविधा यांसारख्या विषयांवरही या मेळाव्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.




या कार्यक्रमाचे आयोजन पूर्वनियोजित नसल्याने काही मान्यवरांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्यांनी आपल्या विभागातील कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. डहाणू व तलासरी तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख, विधानसभा संघटक, क्षेत्र प्रमुख, तालुका व शहर प्रमुख तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात उपस्थित राहून पक्षाला बळ देण्याचे आवाहन शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments