मुसळधार पावसाने वणईतील घर जमीनदोस्त; पारधी दांपत्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलासा
डहाणू तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हानी होत असून, नैसर्गिक आपत्तीचे सावट पसरले आहे. वणई (भट्टीपाडा) येथे झालेल्या दुर्घटनेत शिणवार भिवा पारधी यांचे घर कोसळून पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी पारधी दांपत्य बेघर झाले. या संकटाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून डहाणू तालुका आदिवासी सेलचे अध्यक्ष विलास सुमडा यांच्या माध्यमातून पीडित कुटुंबाला तात्काळ मदत देऊन आधार देण्यात आला.
मुसळधार पावसात पारधी यांच्या घराचे छत कोसळून घर जमीनदोस्त झाले. त्या वेळी घरात शिणवार पारधी व त्यांची पत्नी होते. परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि चिखलामुळे मदत पोहोचवणे कठीण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच विलास सुमडा यांनी तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते सुशांत चव्हाण तसेच युवा नेते करण ठाकूर यांचे बंधू सिद्धार्थ ठाकूर यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यानंतर पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होऊन घराची पाहणी केली व पीडित दांपत्याला धीर दिला. जिल्हाध्यक्ष व माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या आदेशानुसार तसेच युवा नेते करण ठाकूर यांच्या पुढाकाराने दुसऱ्याच दिवशी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. या मदतीमुळे विस्थापित दांपत्याला दिलासा मिळाला.
या मदतकार्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन भोईर, कृष्णा सातपुते, राजेश ठाकूर, वणई गावचे बूथ प्रमुख मुकेश गहला, तसेच ग्रामस्थ गोटु दुबळा, विकास करमोडा व अशोक भुयाल उपस्थित होते. दरम्यान, डहाणूसह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसामुळे घरे, झोपड्या व शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा कठीण काळात राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्थांकडून मिळणारी मदत ग्रामस्थांसाठी मोठा आधार ठरत आहे.



Post a Comment
0 Comments