भीमबांध येथे गौरी विसर्जनासाठी गेलेल्या वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू
डहाणू : जितेंद्र टोके
डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील लोकप्रिय पर्यटनस्थळ भीमबांध येथे मंगळवारी संध्याकाळी गौरी विसर्जनासाठी गेलेल्या खानिव गावातील शांताराम मंगळ्या चौरे या ६२ वर्षीय वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शांताराम चौरे हे वाघाडी येथील नातेवाईकांकडे गौरी गणपतीच्या सणानिमित्त आले होते. विसर्जनानंतर ते आंघोळीच्या उद्देशाने भीमबांध परिसरात गेले असता सूर्या नदीत कवडास धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र प्रवाहात ते वाहून गेले. ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र, जोरदार पाण्यामुळे शोधकार्य अडथळ्यात आले. रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रयत्न सुरू ठेवण्यात आले. अखेर बुधवारी दुपारी पाणी ओसरल्यानंतर भीमबांध परिसरात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर खानिव गावात हळहळ व्यक्त होत आहे. शांताराम चौरे हे गावातील सर्वांना आपुलकीने वागणारे म्हणून परिचित होते. त्यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भीमबांध परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अपघात घडले असून, ग्रामपंचायतीने पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावले आहेत. तरीदेखील पर्यटक पाण्यात उतरतात, असे सरपंच प्रशांत सातवी यांनी सांगितले. त्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.



Post a Comment
0 Comments