आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्या – आमदार विनोद निकोले
डहाणू : जितेंद्र टोके
आदिवासी विकास विभागातील वर्ग ३ व वर्ग ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी ठाम मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री तसेच मोठ्या संख्येने आदिवासी रोजंदारी कर्मचारी उपस्थित होते.
गेल्या साठ दिवसांपासून आदिवासी विकास विभागातील वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. दीर्घकाळ चाललेल्या या आंदोलनानंतरही प्रशासन न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. तसेच,आदिवासी विकास मंत्री असंवेदनशील वक्तव्य करीत असल्याची टीकाही या वेळी करण्यात आली. आंदोलनाला अधिक बळ मिळावे यासाठी मागील आठवड्यात आंदोलनकर्त्यांनी डहाणू येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन सहकार्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांनी इशारा दिला की, त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य न करता नवीन भरती प्रक्रिया राबविली गेल्यास ती तीव्र आंदोलनातून रोखण्यात येईल.
जुन्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य न देता अन्यायकारक पद्धतीने भरती करण्याचा प्रयत्न झाल्यास आदिवासी समाज रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवेल, असा कठोर इशारा यावेळी देण्यात आला. शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आंदोलनकर्त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.



Post a Comment
0 Comments