अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राचा दहा वर्षांचा प्रवास
संपादक : जितेंद्र टोके
ग्रामीण भागात खगोलशास्त्राची गोडी जागविणारे अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र नुकतेच आपल्या कार्याचा दहा वर्षांचा टप्पा पार करून पुढील वाटचालीस सज्ज झाले आहे. या दशकभरातील चढ-उतारांची आठवण करून देताना केंद्राचे संचालक, आदिवासी खगोल अभ्यासक व लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी आनंद आणि अभिमान व्यक्त केला.
सुरुवातीच्या काळात अनेक दानशूर व्यक्ती, संस्था, मित्रपरिवार व नातेवाईकांनी दिलेल्या सहकार्यामुळे केंद्राची पायाभरणी झाली. मात्र करोना काळ हा सर्वांत मोठा अडथळा ठरला. त्या कठीण परिस्थितीत "युमेता" या सेवाभावी संस्थेने मदतीचा हात पुढे केल्यामुळेच केंद्र टिकून राहिले, असे घाटाळ यांनी नमूद केले.
करोनोत्तर काळात विविध जनजाती संस्था, अध्ययन संस्था आणि काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक व वस्तूरूप मदत केल्यामुळे केंद्राला नवसंजीवनी मिळाली व ते पुन्हा उभारी घेऊ शकले. आजवर शेकडो शाळा व दहा हजारांहून अधिक विद्यार्थी या केंद्रातून खगोलविषयक माहिती घेऊन गेले आहेत. हा आकडा पुढील काळात लाखाच्या घरात नेण्याचा मानस असल्याचे घाटाळ यांनी सांगितले.
सध्या केंद्र अधिक सुसज्ज करण्यासाठी आर्थिक तसेच वस्तूरूप साधनसामग्रीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “समाजाच्या सहकार्यामुळेच हा प्रवास अधिक सक्षम होईल आणि खगोलशास्त्राची गोडी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचेल,” असे आवाहन घाटाळ यांनी केले.
📞 संपर्क : चंद्रकांत घाटाळ – संचालक, अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र कासा. मो. ७३५०१३१४८०





Post a Comment
0 Comments