नानिवली गावात शबरी महामंडळाच्या प्रकल्पाचा शुभारंभ; आदिवासी कुटुंबांना कुक्कुटपालनातून स्वावलंबनाची नवी दिशा
डहाणू : शैलेश तांबडा
पालघर जिल्ह्यातील नानिवली गावात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक यांच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत “हाऊसहोल्ड लेव्हल पॉल्ट्री युनिट्स अँड मार्केटिंग लिंकजेसेस” या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. जन्मभूमी कॉप शॉप सहकारी संस्था मर्या. यांना मंजूर झालेल्या या प्रकल्पांतर्गत दहा आदिवासी कुटुंबांना घराजवळ कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी प्रत्येकी एक पिंजरा व अंडी देणाऱ्या कोंबडीची पिल्ले देण्यात आली. अशा प्रकारे एकूण दहा पिंजरे आणि तीनशे कोंबडी पिलांचे वाटप करून आदिवासी कुटुंबांना पूरक उद्योगाचा आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पिंजरे प्रदान करण्यात आले. यावेळी शबरी महामंडळाचे कोकण विभागाचे व्यवस्थापक राजेश पवार, प्रादेशिक व्यवस्थापक (जव्हार) योगेश पाटील, सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश सवरा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना प्रकल्पाची अंमलबजावणी, कुक्कुटपालन व्यवसायातील संधी, बाजारपेठेतील मागणी आणि तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असून अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होणार आहे. महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, तर बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून प्रशिक्षित कामगारांची निर्मिती होईल. शबरी महामंडळाच्या या उपक्रमामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची मजबुती, आदिवासी भागातील उत्पादनवाढ आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यास हातभार लागेल, असे मान्यवरांनी व्यक्त केले.



Post a Comment
0 Comments