Type Here to Get Search Results !

डहाणूतील शिवसेना मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

डहाणूतील शिवसेना मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; निलेश सांबरेंच्या नेतृत्वात नव्या राजकीय समीकरणांची चिन्हे



डहाणू (दि.०९ सप्टेंबर) : शिवसेना पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार डहाणू येथे रविवारी सकाळी झालेला मेळावा स्थानिक राजकारणाला नवे वळण देणारा ठरला. डहाणू येथील दशाश्री माळी सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते व जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डहाणू व तलासरी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.


डहाणू व तलासरी तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील या मेळाव्यात डहाणू विधानसभा क्षेत्रातील विविध जिल्हा परिषद गटांमधून तसेच नगरपरिषद क्षेत्रातील इतर पक्षांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या प्रमाणावरील पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणातील समीकरणांमध्ये आमूलाग्र बदल होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद आणखी भक्कम झाली असून, विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आतापर्यंत काही विशिष्ट गटांमध्ये मर्यादित राहिलेली ताकद आता विविध स्तरांवर विस्तारली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे या मेळाव्यातून दिसून आले.


मेळाव्यातील भाषणादरम्यान निलेश सांबरे यांनी आक्रमक भूमिका घेत आगामी काळात पालघर जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगरपरिषदेवर भगवा फडकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचे कार्यकर्ते एकदिलाने काम करतील तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या घोषणेला कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट व जल्लोषाने संपूर्ण सभागृह दणाणून गेले. सांबरेंच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य जागृत झाल्याचे वातावरण निर्माण झाले. या मेळाव्यामुळे डहाणू-तलासरी परिसरातील आगामी निवडणुकांचे राजकारण नव्या टप्प्यावर पोहोचले आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेक गट-तटांचे कार्यकर्ते थेट शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांचे राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. मेळाव्याच्या शेवटी स्थानिक नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांना एकत्र राहून आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा झेंडा डहाणू व तलासरी परिसरातील प्रत्येक पातळीवर फडकवण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे संघटनेची ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


या मेळाव्याला जिल्हा व तालुक्यातील मान्यवर नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठींबा दर्शविला. प्रवक्ता व संघटक केदार काळे, उपनेत्या ज्योती मेहेर, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, उपजिल्हा प्रमुख समीर सागर, माजी आमदार अमित घोडा, महिला जिल्हा संघटक वैदेही वाढाण, जिजाऊ संघटनेचे पालघर लोकसभा प्रमुख जावेद खान, डहाणू विधानसभा अध्यक्ष कल्पेश भावर, शिवसेना क्षेत्र प्रमुख सुनील ईभाड, तालुका प्रमुख हेमंत धानमेहेर, तलासरी तालुका प्रमुख आशिर्वाद रिंजड, संतोष देशमुख, रमेश पाटील, जिजाऊचे संतोष पवार, प्रताप पटेल यांसह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Post a Comment

0 Comments