डहाणू पंचायत समिती येथे समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळा व महाआवास पुरस्कार वितरण सोहळा
आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान
डहाणू : शैलेश तांबडा - (०८ सप्टेंबर)
डहाणू पंचायत समितीच्या सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची तालुका स्तरीय कार्यशाळा तसेच महाआवास अभियान २०२३-२४ आणि २०२४-२५ च्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सोमवारी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी रेखा बनसोडे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार विनोद निकोले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना घरकुल बांधकाम प्रक्रिया, तळ जमीन नावावर करण्याचे टप्पे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पंचायत राज अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी अभियानाचे उद्दिष्ट समजावून सांगत १७ सप्टेंबर रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या.

या कार्यक्रमात महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती व लाभार्थ्यांचा आमदार निकोले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यामुळे ग्रामीण भागात विकास योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यासह, ग्रामपंचायतींना नवे बळ मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.



Post a Comment
0 Comments