भाद्रपद पौर्णिमेला दुर्मिळ खग्रास चंद्रग्रहण; संपूर्ण भारतात दिसणार
डहाणू : (दि.०६ सप्टेंबर) - भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने रविवार, ७ सप्टेंबर रोजी आकाशात एक दुर्मिळ खगोलीय घटना अनुभवता येणार आहे. या दिवशी संपूर्ण भारतातून खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र, कासा चे संचालक व खगोल अभ्यासक चंद्रकांत घाटाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ग्रहणाची सुरुवात रात्री ९.५७ वाजता होईल. रात्री ११.४२ वाजता ग्रहणाचा मध्यकाळ असेल, तर पहाटे १.२७ वाजता ग्रहणाची समाप्ती होणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी सुमारे तीन तास ३० मिनिटांचा असून खग्रासाचा काळ रात्री ११.०० ते १२.२२ वाजेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे तब्बल एक तास २३ मिनिटे चंद्र पूर्णपणे सावलीत झाकलेला दिसणार आहे.
धार्मिक परंपरेनुसार चंद्रग्रहणाशी संबंधित अनेक विधी व व्रते सांगितली गेली आहेत. मात्र ती पाळावीत की नाही हे प्रत्येकाच्या श्रद्धेवर अवलंबून असल्याचे घाटाळ यांनी नमूद केले. त्याचबरोबर या घटनेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आस्वाद घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. सूर्यग्रहणाच्या वेळी डोळ्यांना प्रखर किरणांचा त्रास होतो, मात्र चंद्रग्रहणात तसे नसल्याने हे ग्रहण कोणत्याही विशेष चष्म्याविना उघड्या डोळ्यांनी सुरक्षितपणे पाहता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालघर जिल्ह्यात पावसाळी हवामान असल्याने ग्रहणावेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रहण स्पष्ट दिसेलच असे नाही. तरीही जिथे शक्य आहे तिथे नागरिकांनी या अद्भुत खगोलीय घटनेचा आनंद घ्यावा, असे आवाहन अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. ग्रहण पाहण्यासाठी कोणत्याही विशेष सोयीसुविधांची गरज नाही. नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवरून किंवा मोकळ्या जागेत उभे राहून सहजपणे हा अद्भुत दृश्य अनुभवावा, असेही केंद्राकडून सांगण्यात आले. भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे हे खग्रास चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरणार आहे.



Post a Comment
0 Comments