मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पुलावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात ; टोल लाखोंचा तर रस्ता खड्ड्यांचा!
दररोज कोट्यवधींचा टोल वसूल; तरीही रस्त्यांची दुरवस्था – स्थानिकांचा प्रशासनाला सवाल
देशातील सर्वाधिक वर्दळीच्या महामार्गांपैकी एक मानला जाणारा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आज प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा ठरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज कोट्यवधी रुपयांचा टोल महसूल वसूल होत असतानाही पुलांची आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.
चारोटी परिसरातील धानिवरी आणि महालक्ष्मी पुलांवर प्रचंड खड्डे पडले असून लोखंडी सळ्या आणि स्टीलची जाळी उघडी पडल्याने अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांत साचलेले पाणी वाहनांवरील ताबा सुटण्याचे मोठे कारण ठरत आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने “जीव धोक्यात घालून टोल वसूल करणे हा कोणता न्याय?” असा सवाल वाहनचालक आणि स्थानिकांनी उपस्थित केला आहे. पुलांच्या खालून वाहणारे नदी-नाले ही बाब अधिकच धोकादायक आहे. पाणी झिरपून पुलांच्या पायाभरणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने केवळ वाहनचालकांचाच नव्हे तर संपूर्ण पुलाचाच जीव धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासन आणि ठेकेदारांवर निश्चितपणे टाकावी लागेल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे कायम दुय्यम दृष्टीने पाहिले जाते, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखाद्याचा जीव गेला तरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल उपस्थित करत तातडीने दुरुस्तीचे काम करून प्रवाशांच्या सुरक्षिततेची हमी देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले.
१) प्रतिक्रिया -
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदारांना मनमानीचे फावले असून, महामार्गांवर निकृष्ट दर्जाची कामे केली जात आहेत. भ्रष्टाचारयुक्त या कामगिरीचा फटका निष्पाप नागरिकांना बसतो आणि जीव गमावण्याची वेळ येते. यासाठी ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरणावर कठोर कारवाई झाल्याशिवाय पर्याय नाही.
-- शैलेश कोरडा, सरपंच, धानीवरी ग्रामपंचायत
२) प्रतिक्रिया -
महामार्गावरील निकृष्ट दर्जाची कामे ही प्रशासनाच्या बेफिकीरीचे जिवंत उदाहरण आहे. ठेकेदारांचा भ्रष्टाचार आणि प्राधिकरणाचे मौन यामुळे निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई झालीच पाहिजे.
-- अंकुश गोरवाला,सामाजिक कार्यकर्ता, धानीवरी





Post a Comment
0 Comments