Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या मेळाव्यास डहाणूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; निवडणूकीसाठी कार्यकर्ते सज्ज

शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यास डहाणूमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद; निवडणूकीसाठी कार्यकर्ते सज्ज



डहाणू : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा शनिवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी मसोलीतील दशश्रीमाळी सभागृहात दमदार वातावरणात पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याने नवचैतन्य निर्माण केले. या बैठकीत जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भक्कम हजेरी लागली. यावेळी पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, उपनेते निलेश सांबरे, आमदार राजेंद्र गावित, राजेश शहा, जगदीश धोडी, मनिषा निमकर, केदार काळे, वैदेही वाढाण, समीर सागर, सुशील चुरी, जावेद खान, कल्पेश भावर, हेमंत धर्ममेहेर, डॉ. आदित्य अहिरे, सुनील ईभाड, रुपजी कोल, विजय रजपूत, कुणाल पाटीलसहीत अनेक पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभागृहात ‘एकनाथ शिंदे जिंदाबाद’ च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला.




या मेळाव्यादरम्यान स्थानिक पातळीवरील विविध अडचणी कार्यकर्त्यांनी थेट मांडल्या. पदाधिकारींनी त्या गांभीर्याने ऐकून घेत तातडीच्या उपाययोजनांची ग्वाही दिली. डहाणू नगरपरिषदेला लक्ष्य करत, मागील सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या नावाखाली स्वतःचा फायदा करून घेतल्याची तीव्र टीका झाली. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा डहाणूवर फडकवणारच, असा निर्धार यावेळी करण्यात आला. मेळाव्यात "मित्रपक्षांसोबत युतीचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वावर सोडण्यात येईल" अशी स्पष्ट भूमिका मांडत, गोंधळ न माजवता ठाम आणि एकजूट धोरणाची भूमिका मांडण्यात आली. अंतर्गत मतभेद विसरून, संघटनेच्या बळकटीसाठी एकत्र येण्याचे आवाहन वरिष्ठ नेत्यांनी केले. याच बैठकीत विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे पक्षात नवसंजीवनी आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. नव्या सदस्यत्व अभियानाचीही घोषणा यावेळी झाली, ज्यामुळे पक्षाची घडी आणखी मजबूत होणार आहे. संपूर्ण मेळाव्याने पालघर जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटन शक्तीचे प्रत्यंतर दिले. शिस्तबद्ध आयोजन, नेतृत्वाची स्पष्ट दिशा, कार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती आणि ठाम भूमिका या साऱ्याच्या जोरावर शिवसेना आगामी निवडणुकांना सज्ज झाली असल्याचे यावेळी ठळकपणे दिसून आले.




Post a Comment

0 Comments