डहाणूतील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा मुंबई येथे शिंदे गटात प्रवेश; राजकीय समीकरणांना मिळाली कलाटणी
डहाणू : डहाणू तालुक्यातील राजकारणाला नवे वळण देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी घडली. मुंबई येथील मुक्तागिरी निवासस्थानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात डहाणूचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र माच्छी उर्फ राजू माच्छी , माजी नगरसेवक सईद शेख, माजी नगरसेविका माधुरी धोडी, मिलिंद मावळे, आसवे ग्रामपंचायत सरपंच विष्णू गुरोडा, पिंटू सावरा, मिलिंद पाटील, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खुताडे, हितेश माच्छी यांच्यासह इतर शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशामुळे डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. याचे पडसाद केवळ डहाणू नाही, तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात उमटत आहेत. यामुळे आगामी डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेने आपली तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक पक्षांतील कार्यकर्ते आणि नेते शिवसेनेत सामील झाल्यामुळे हा एक सामर्थ्यप्रदर्शनाचा भाग असल्याचे मानले जात आहे. यामध्ये माजी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी असल्याने या प्रवेशाला केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणात्मक महत्त्वही लाभले आहे. या घडामोडींमुळे तालुक्यातील इतर राजकीय पक्षांच्या रणनीतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन जी बांधणी सुरू केली आहे, ती आगामी काळात पक्षाला मोठा राजकीय लाभ मिळवून देऊ शकते.
दरम्यान, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी आणखी काही नेते आणि कार्यकर्ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहतील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. एकूणच, डहाणूतील हा पक्षप्रवेश शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हा एक इशाराही ठरू शकतो. यावेळी उपनेते तथा पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक, उपनेते निलेश सांबरे, पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे, समीर सागर, डॉ.आदित्य अहिरे, सुनिल ईभाड, हेमंत धर्ममेहर, रुपजी कोल, रमेश पाटील, विपुल पटेल सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment
0 Comments