Type Here to Get Search Results !

डहाणूत भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

डहाणूत भाजपच्या पक्षप्रवेश सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद


अमित पटेल, सुभाष आंबात यांचा भाजपात प्रवेश; संघटनात्मक शक्तीला नवे बळ



डहाणू - डहाणूतील रामवाडी येथील जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि.३० ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षप्रवेश सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पक्षशक्ती वाढवली.



या प्रसंगी बहुजन विकास आघाडीचे अमित पटेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) सुभाष आंबात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि अभिनंदन करून केले. त्यांनी नवागतांचे मनःपूर्वक स्वागत करताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ एक राजकीय पक्ष नसून राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देणारी एक विचारधारा आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे डहाणू तालुक्यातील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजप मजबूत पाय रोवेल आणि विकासाभिमुख नेतृत्व डहाणू तालुक्यात दृढ करेल. त्यांनी सर्वांना संघटनात्मक कार्यात जोमाने सहभागी होण्याचे आवाहन केले.



या पक्षप्रवेशामुळे डहाणू परिसरातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, भाजपची संघटनात्मक शक्ती आणखी वृद्धिंगत होणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. यावेळी जगदीश राजपूत, पंकज कोरे, रमेश काकड यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करत पक्षविस्ताराचा आनंद व्यक्त केला.





Post a Comment

0 Comments