जांबुगावातील मानपाडा भागात बिबट्याचा वावर; परिसरात भीतीचे वातावरण
डहाणू, ता. ३१ ऑक्टोबर : डहाणू तालुक्यातील जांबुगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मानपाडा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता बिबट्याच्या पंजाचे ठसे सापडले. त्यामुळे वन विभागाकडून सतर्कता वाढविण्यात आली असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच, मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य उपकेंद्रापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर रस्त्यावर बिबट्या फिरताना काही नागरिकांनी पाहिल्याचे सांगितले आहे. ही माहिती मिळताच बोर्डी वन परिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान एका पाण्याच्या हौदाजवळ बिबट्याचे पंजाचे ठसे आढळून आले. परिसरात दाट झाडी, पाण्याचे स्रोत आणि रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने भक्ष्याच्या शोधात बिबट्या या भागात फिरत असावा, असा अंदाज वन्यजीव प्रेमी सूर्यहास चौधरी यांनी व्यक्त केला. बिबट्याचा ठावठिकाणा लावण्यासाठी वन विभागाकडून तीन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच गस्त वाढवून संबंधित भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी शांतता राखावी, रात्री एकटे फिरू नये आणि पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
या संदर्भात बोर्डी वन परिक्षेत्र अधिकारी राजेश सारणीकर यांनी सांगितले की, मानपाडा परिसरात बिबट्याचा वावर निश्चितपणे दिसून आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असून, बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. मानपाडा हा आदिवासी बहुल भाग असून, परिसरात चिकू बागायती आणि शेती मोठ्या प्रमाणावर आहे. वन विभागाची चिकुवाडी आणि सामाजिक वनीकरण क्षेत्र असल्याने हा भाग नैसर्गिकदृष्ट्या वन्यजीवांना अनुकूल आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर वाढल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.




Post a Comment
0 Comments