Type Here to Get Search Results !

निकणे ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचा संताप ; ०३ नोव्हेंबरला लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचा इशारा

निकणे ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांचा संताप ; ०३ नोव्हेंबरला लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचा इशारा


ग्रामस्थांच्या मुलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; पाणी, रस्ते, प्रकाशयोजना आणि पारदर्शकतेच्या मागण्या अग्रस्थानी


(कॉ. शिवप्रसाद कांबळे ग्रामसेवकांना निवेदन सादर करताना)


डहाणू, ता. ३० ऑक्टोबर - डहाणू तालुक्यातील निकणे ग्रामपंचायतीविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात येत्या ३ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीकडून मूलभूत सुविधा पुरविण्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाईपासून ते निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांपर्यंत अनेक समस्या प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर अधिकच तीव्र झाला आहे. भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी पक्षाच्या डहाणू तालुका सहसचिव कॉम्रेड सविता महालोडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे. प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास बेमुदत महाघेराव घालण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


कॉ. सविता महालोडा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावात गेल्या काही काळापासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जात असून, स्वच्छ पिण्याचे पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच, नागरिकांकडून दिवाबत्तीकर आकारण्यात येऊनही रस्त्यांवरील प्रकाशयोजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही. या सर्व समस्या वारंवार निदर्शनास आणूनही ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी काही ठोस मागण्या पुढे केल्या आहेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याची तातडीने व्यवस्था करावी, दर्जेदार रस्त्यांची बांधणी करून निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, बांधकाम मजूर व मनरेगा कामगारांना प्रमाणपत्रे वितरित करावीत, पेसा निधीचा पारदर्शक हिशोब सादर करावा आणि दिवाबत्तीकरातून मिळालेल्या निधीचा वापर करून प्रकाशयोजना तातडीने कार्यान्वित करावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत. याशिवाय गवत पावळीसाठी परवानाधारक वखारींना पारदर्शक दर निश्चित करणे आणि पाण्याच्या टंचाई निवारणासाठी मनरेगा योजनेतून गाळकाढीची कामे राबविणे, या मागण्यांचाही यात समावेश आहे. 


या संदर्भात ग्रामपंचायत निकणेने गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांना लेखी निवेदन पाठवून या प्रश्नांकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, गावात आंदोलनाच्या तयारीला जोर आला असून, ग्रामपंचायत परिसरात चहुबाजूंनी हालचाली सुरू आहेत. ग्रामस्थांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून, “ग्रामपंचायतने जबाबदारी पार पाडली नाही, तर जनतेलाच रस्त्यावर उतरावे लागते,” अशा भावना व्यक्त होत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा हे आंदोलन निकणेपुरते मर्यादित न राहता संपूर्ण तालुक्यात पसरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.











Post a Comment

0 Comments