Type Here to Get Search Results !

कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला ; आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकाराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला ; आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकाराला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


तलासरी तालुक्यातील पर्यटनास मिळणार नवी चालना; बोटिंग व सुशोभीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी


डहाणू, १६ ऑक्टोबर 



डहाणू विधानसभेचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी गुरुवार, दि.१६,ऑक्टोंबर रोजी तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण परिसराची पाहणी केली. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही काळ सुरक्षा आणि देखभालीच्या कारणास्तव या धरण परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र, आजपासून पुन्हा एकदा पर्यटकांना प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे. आमदारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांनी धरण परिसर पर्यटकांसाठी खुला करण्याचे आदेश दिले आहेत.



या पाहणीदरम्यान आमदार निकोले यांनी धरण परिसरातील नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता येथे पर्यटनवृद्धीस चालना देण्यासाठी बोटिंग सुविधा सुरू करणे तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी या संदर्भात प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्याचे आदेश दिले असून, या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिकांनी आमदार विनोद निकोले यांच्या या पुढाकाराचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. “धरण परिसर पुन्हा खुला झाल्याने स्थानिकांनाही सकस विरंगुळ्याची जागा मिळाली असून, पर्यटकांची वर्दळ वाढल्यास परिसराच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीला चालना मिळेल,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.



या पाहणी दौऱ्यात माजी उपसभापती कॉ. नंदकुमार हाडळ, उपसरपंच कॉ. मारिया वाडू, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. धरण प्रकल्पाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी आमदारांना धरण परिसराची सविस्तर माहिती दिली.


Post a Comment

0 Comments