घोलवडच्या कारागिरीला आधुनिकतेची जोड; पारंपारिक कलेतून नवे रोजगार
डहाणू : निसर्गस्नेही जीवनशैलीकडे झुकणाऱ्या ग्राहकांची पसंती आणि पारंपारिक कलेचे जतन यांचा मेळ साधत, डहाणू तालुक्याच्या घोलवड गावातील कारागिरांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बाजारपेठांमध्ये प्लास्टिक व कृत्रिम सजावटीच्या वस्तूंनी घेतलेल्या आघाडीच्या पार्श्वभूमीवर, या गावातील ६० हून अधिक कलाकारांनी बांबूपासून बनवलेल्या कंदिल, टेबल लॅम्प्स आणि इतर हस्तकला वस्तूंनी आपले खास स्थान निर्माण केले आहे.
घोलवड ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण उपक्रमामुळे या पारंपरिक कारागिरांना नव्या प्रकारची कौशल्ये मिळाली. यामुळे पूर्वी फक्त टोपली, सूप व पाट्या बनवणाऱ्या हातांना आता आधुनिक बाजारपेठेतील गरजांनुसार नवे रूप मिळाले आहे. पर्यावरणपूरक, आकर्षक आणि टिकाऊ अशा या कंदिलांना ग्राहकांकडून प्रचंड मागणी असून, दिवाळीच्या सणानिमित्त त्यांची विक्री वाढली आहे. या उपक्रमातून केवळ रोजगारनिर्मितीच झाली नाही, तर ग्रामपंचायतीच्या सक्रिय सहभागामुळे पारंपरिक बांबू कलेला नवसंजीवनी मिळाली आहे. चिकू महोत्सव, मँगो फेस्टिवल, डहाणू फेस्टिवल आणि वडोदरा येथील महोत्सवांमध्ये या वस्तूंना मिळालेला भरभरून प्रतिसाद हा यशाचा निर्णायक टप्पा ठरला आहे. या यशस्वी प्रयोगातून ग्रामीण भागातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत रोजगाराचे नवे पर्याय निर्माण होऊ शकतात, याचा प्रत्यय घोलवडच्या या कारागिरांनी दिला आहे.
स्थानिक कारागिरांना रोजगार मिळावा आणि पारंपरिक बांबू हस्तकलेला आधुनिकतेची जोड मिळून तिचे संवर्धन व्हावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन या कलेला नवी दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यामुळे गावात पर्यटन वाढेल, आर्थिक स्तर उंचावेल आणि ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होईल.
— रविंद्र बुजड, सरपंच, घोलवड ग्रामपंचायत




Post a Comment
0 Comments