डहाणूतील मोटारसायकल चोरी प्रकरणात पालघर पोलिसांना मोठे यश; आरोपी बोईसरहून अटक
डहाणू :(प्रतिनिधी) - डहाणू शहरातील रामवाडी परिसरातून चोरी गेलेली मोटारसायकल शोधून काढण्यात आणि आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हा गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस बोईसर येथून अटक करण्यात आली आहे.
सईद रईस मिर्झा (वय २२, रा. आर्शिर्वाद अपार्टमेंट, डहाणू पूर्व) यांनी १० ऑक्टोबर २०२५ रोजी डहाणू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांची एंटोर्क १२५ दुचाकी (MH-18/DB-3828) दि.०९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२.०५ ते सकाळी ८.३० या वेळेत अपार्टमेंटसमोरील पार्किंगमधून अज्ञात व्यक्तीने चोरून नेली होती. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीच्या घटनेची गंभीर दखल घेत पालघर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर आणि डहाणू पोलीस ठाणे अशा विशेष संयुक्त पथकांची स्थापना करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे १७ ऑक्टोबर रोजी बोईसर येथून भावाराम पाताराम चौधरी (वय ३२, रा. यशवंत सृष्टि, बोईसर) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने फक्त डहाणूतीलच नव्हे, तर पालघर रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पो.उ.नि. गोरखनाथ राठोड, पोहवा संदीप सरदार, राकेश पाटील, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, पोअंम महेश अवतार (सर्व - स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. या प्रकरणाचा पुढील तपास डहाणू पोलिस ठाण्याचे पो.उ.नि. दिनेश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


Post a Comment
0 Comments