डहाणूत राष्ट्रवादी काँग्रेसचा शक्तिप्रदर्शनात्मक मेळावा उत्साहात पार पडला
‘लाडकी बहिण योजना’ सुरूच राहणार; अजित पवारच खरे ‘दादा’ – मंत्री नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
डहाणू (ता.१७) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पालघर जिल्हा कार्यकर्ता मेळावा डहाणू येथे दशाश्री माळी सभागृहात जल्लोषात व उत्साहात पार पडला. अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि पालघर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात 'लाडकी बहिण योजना' सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मेळाव्यात बोलताना झिरवाळ यांनी ‘लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, ती सुरूच राहील. जोपर्यंत अजित पवार आहेत, तोपर्यंत या योजनेला खंड पडणार नाही,’ असे ठामपणे सांगितले. त्यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलताना, ‘अजित दादा दिलेला शब्द पाळतात. म्हणूनच तेच खरे ‘दादा’ आहेत,’ असेही नमूद केले. ते पुढे म्हणाले, ‘पालघर जिल्ह्यात सध्या आमचा आमदार नाही, तरीही पक्ष वाढतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपलेला नाही, उलट नवे नेतृत्व घडवून, नव्या जोमात आम्ही जिल्ह्यात विस्तार करत आहोत.
जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर यांनी भाषणात ‘पालघर, डहाणू, वाडा आणि जव्हार हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आहेत. मात्र मित्रपक्षांनी आम्हाला गृहीत धरू नये. आमचा पक्ष वाढतो आहे आणि आम्हाला सत्तेत योग्य प्रतिनिधित्व मिळालेच पाहिजे,’ असा स्पष्ट इशारा दिला तर वसई-विरारचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी, ‘नेतृत्व आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. वसई-विरार महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असूनही, आम्हाला जागा वाटपात न्याय मिळत नाही. मित्रपक्ष आमचा वापर करून घेत आहेत,’ अशी स्पष्ट खंत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘पक्षाने आमची ताकद ओळखून वसई-विरारमध्ये आम्हाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. शिवाय ज्येष्ठ नेते संदीप वैद्य यांनी भाषणात म्हटले, ‘आज आपली लढाई थेट विरोधकांशी नाही, तर अनेकदा मित्रपक्षांशीच आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर आपले नेतृत्व मजबूत करणे अत्यंत गरजेचे आहे. पक्ष कार्यकर्त्यांना सोबत घेत जिल्हा पातळीवर संघटन बळकट करणे ही आजची गरज आहे,’ असे ते म्हणाले. महिला जिल्हाध्यक्षा रोहिणी शेलार यांनी ‘जिल्ह्यात आमचा आमदार नसल्यामुळे अनेक शासकीय योजना, महिला विषयक प्रकल्प अडकतात. महिला कार्यकर्त्यांना शासकीय यंत्रणेतून मदत मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे,’ अशी भावना व्यक्त केली.
या मेळाव्यात डहाणू, तलासरी, वाडा, जव्हार, मोखाडा, पालघर आदी तालुक्यांतून हजारो कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. युवक, महिला आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय होता. मेळाव्यानंतर झिरवाळ यांनी डहाणू तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीत नुकसानग्रस्तांना मदत पुरवण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करावे, अशी सूचना केली. तसेच, ‘सरकारी योजना केवळ कागदावर न राहता त्या खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले.





Post a Comment
0 Comments