Type Here to Get Search Results !

जव्हार येथे अवैध दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जव्हार येथे अवैध दारूविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – ७ लाखांचा मुद्देमाल जप्त



जव्हार, (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या सूचनेनुसार संपूर्ण जिल्ह्यात ठोस आणि प्रभावी पावले उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांच्या पथकाने जव्हार येथे मोठी कारवाई करत सुमारे सात लाखांचा अवैध दारू साठा जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे.


गुरुवार,१६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत टेम्पोद्वारे अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. यानुसार मौजे जव्हार येथील जिव्हाळा हॉटेल समोर सापळा रचण्यात आला. काही वेळातच टेम्पो क्रमांक MH-01-EM-9626 या वाहनास थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये दमण बनावटीची २,०१,००० रुपयांची अवैध दारू आढळून आली. सदर टेम्पो चालवत असलेला चालक गोपाल हिरा सिंग (वय ३५, रा. खोराण, ओलादर, जि. राजसमंद, राजस्थान) याला तात्काळ अटक करण्यात आली. अवैध दारू व टेम्पो असा एकूण ७,००,००१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६१/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(अ), ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर, पोहवा भगवान आव्हाड, आणि पोअंम विशाल लोहार (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) यांनी केली.



Post a Comment

0 Comments