नदीत बुडून चौथीतील विद्यार्थिनीचा मृत्यू ; रुग्णवाहिकेअभावी गोंधळ, आमदार निकोले यांचा तातडीचा हस्तक्षेप
डहाणू : डहाणू तालुक्यातील चाळणी परिसरात मंगळवारी संध्याकाळी घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. दादडे येथील अरविंद आश्रम शाळेत चौथीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या नऊ वर्षांच्या अलका कासम भावर या चिमुरडीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने एक निष्पाप जीव हरपल्याची हळहळ व्यक्त केली जात असतानाच, दुर्घटनेनंतर निर्माण झालेल्या आरोग्य व्यवस्थेतील उदासीनतेने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली.
मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. दाभाडी, हटीचामाळ येथील रहिवासी असलेली अलका भावर विद्यार्थिनी चाळणी परिसरातील नदीपात्रात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच शाळेतील शिक्षक रविंद्र गिंभल आणि काही ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत तिचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न केला. तिला सायवन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर शवविच्छेदनासाठी कासा ग्रामीण रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. मात्र, सायवन येथील डॉक्टरांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली. यामुळे मृत मुलीचे नातेवाईक संतप्त झाले व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद निर्माण झाला. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच आमदार विनोद निकोले यांनी तातडीने सायवन आरोग्य केंद्रात भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व तहसीलदार सुनील कोळी यांच्याशी संपर्क साधून पंचनाम्याच्या सूचना दिल्या. घटनास्थळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सरिता भोये तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. अलका हिचा आकस्मिक मृत्यू संपूर्ण गावासाठी मोठा आघात ठरला आहे. तिच्या शाळेमध्येही शोक व्यक्त करण्यात आला असून परिसरात शोककळा पसरली आहे. आमदार निकोले यांनी भावर कुटुंबीयांना शासनामार्फत आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहेत. ही घटना केवळ एक दुःखद अपघात नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील कमकुवतपणाचे आणि शासकीय यंत्रणांच्या हलगर्जीपणाचे प्रतीक ठरत आहे. अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याची मागणी केली आहे.




Post a Comment
0 Comments