पालघरमध्ये टेम्पोच्या बॅटरी चोरीप्रकरणी एकास अटक; चौकशीत चार गुन्ह्यांची कबुली
पालघर, (प्रतिनिधी) : पालघर शहरातील टेभोंडे नाका परिसरात दोन टेम्पोंच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करत एकाला अटक केली असून, चौकशीत त्याने अशा चार चोरींची कबुली दिली आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा वाहनांवरील चोरीचे सत्र उघड झाले आहे.
दिनांक १४ ते १५ मार्च २०२५ दरम्यान, टेभोंडे नाका येथील आंबेडकर चौकाजवळ लाकडाच्या वखारीसमोर उभ्या असलेल्या दोन टेम्पोंमधून अंदाजे ₹१०,००० किमतीच्या बॅटऱ्या चोरल्या गेल्या होत्या. याप्रकरणी तालीब आबीद खान (वय २८, रा. टेभोंडे रोड, पालघर) यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पालघर पोलिसांनी संयुक्त तपास पथक तयार करून शोधमोहीम राबवली. तपासादरम्यान १६ ऑक्टोबर रोजी आझाद ऊर्फ मोहम्मद शफीक बरसाती खान (वय २९, रा. पालघर, मुळगाव पकडीहवा, उत्तर प्रदेश) याला भोपोली फाटा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्यावर पालघर व बोईसर पोलीस ठाण्यांत एकूण चार चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. प्रदीप पाटील, एपीआय योगेश शिंदे व अन्य अधिकाऱ्यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास पोउपनि धनाजी काळे करत आहेत.

Post a Comment
0 Comments