जामशेतमध्ये आमदार विनोद निकोले यांच्या स्वखर्चातून पथदिवे; गावदेवाच्या सणात परिसर प्रकाशमान
डहाणू तालुक्यातील जामशेत गावात गावदेव सणाच्या पार्श्वभूमीवर गावाचा चेहरामोहरा उजळवणारा एक प्रशंसनीय उपक्रम आमदार कॉ. विनोद निकोले यांनी स्वखर्चातून राबविला. जामशेत येथील पाटिलपाडा (गावदेव) व सतीमात परिसरात नवीन पथदिवे बसविण्यात आले. ज्यामुळे संपूर्ण परिसर उजळला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जामशेत भागात गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य होते. पथदिवे नसल्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत होत्या. ही समस्या आमदार निकोले यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वखर्चातून पथदिव्यांची व्यवस्था करत गावदेवाच्या सणाच्या शुभमुहूर्तावर या प्रकाशयोजनेचा शुभारंभ केला. पथदिव्यांच्या प्रकाशात पाटिलपाडा आणि सतीमात परिसर प्रकाशमय झाला. ज्यामुळे गावदेवाच्या सोहळ्याला उजेडाचा नवा रंग लाभला. या दिव्यांमुळे रात्रीच्या वेळी सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून गावात प्रगतीची नवी झळाळी दिसू लागल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले. गावांचा विकास केवळ मोठ्या प्रकल्पांतून होत नाही, तर अशा लहान परंतु, आवश्यक सोयी-सुविधांमधून खरा विकास साधता येतो. लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हेच खरे जनसेवेचे कार्य असल्याची प्रतिक्रिया आमदार निकोले यांनी कार्यक्रमादरम्यान मांडली.
या उपक्रमामुळे जामशेत परिसर सध्या प्रकाशमान आणि सुरक्षित झाला आहे. गावदेवाच्या सणाच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रकाशाचा उपक्रम गावाच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. कार्यक्रमास गावाचे सरपंच कॉ. विकास दौडा, उपसरपंच मोहन पडवले, माजी सरपंच अशोक धोडी, ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आमदार निकोले यांच्या समाजाभिमुख कार्याचे मनापासून कौतुक केले आणि त्यांचे आभार मानले.





Post a Comment
0 Comments