Type Here to Get Search Results !

डहाणूत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा; लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली गवत-पावलीस योग्य दराची मागणी

डहाणूत आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा; लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली गवत-पावलीस योग्य दराची मागणी



डहाणू :- भारताचा मार्क्सवादी-लेनिनवादी लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली सोमवारी डहाणू पंचायत समितीवर आदिवासी शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला. “गवताला भाव द्या!”, “पावलीचा हक्क द्या!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. गवत आणि पावली या कृषी उत्पादनांना योग्य भाव न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करत मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपला हक्क मागितला. मोर्चामध्ये महिला, तरुण आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांच्या हातात लाल झेंडे होते, तर त्यांच्या चेहऱ्यावर संघर्षाची ठाम छाप उमटली होती.



मोर्चादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता, मात्र शेतकऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्धपणे आणि शांततेत आपले आंदोलन पार पाडले. पंचायत समितीकडे पोहोचल्यानंतर प्रतिनिधीमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले आणि या मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी केली. अन्यथा सरकारने दुर्लक्ष केल्यास महामार्ग ठप्प करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.



या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड किरण दुबळा, सविता महालोडा आणि रामजी बरड यांनी केले, तर जिल्हा सहसचिव कॉम्रेड शेरू वाघ यांनी आंदोलनाला दिशा दिली. डहाणू तालुका कमिटी सदस्य कॉम्रेड शिवप्रसाद कांबळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या या मागण्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असा निर्धार या मोर्चातून व्यक्त करण्यात आला.




Post a Comment

0 Comments