डहाणूत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठा प्रवेश; आगामी निवडणुकांपूर्वी सेनेचा जनाधार भक्कम
डहाणू : डहाणू विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा जनाधार दिवसेंदिवस वाढत असून, सोमवारी (२७ ऑक्टोबर) डहाणूत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला. हा भव्य कार्यक्रम पालघर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीत शासकीय बांधकाम विभाग, डहाणू येथे पार पडला.
या प्रसंगी आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. गेल्या काही महिन्यांपासून डहाणू शहर व ग्रामीण भागात पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह लक्षणीय वाढला असून, नव्या प्रवेशामुळे सेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे. मोडगाव जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली. डहाणू शहर व परिसरात असलेल्या नागरिकांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मतदार आता शिवसेनेकडे भक्कम पर्याय म्हणून पाहत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कार्यकर्त्यांच्या एकजुटीने नगराध्यक्षपदासह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा फडकेल. असा विश्वास जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांनी दाखविला, तर सहसंपर्कप्रमुख केदार काळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, प्रत्येकाने स्थानिक पातळीवर जनतेशी संपर्क साधून शिवसेनेच्या योजनांची माहिती द्यावी आणि मतदारांचा विश्वास संपादन करावा.
या पक्षप्रवेशामुळे डहाणू शहर आणि ग्रामीण भागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी निवडणुकांमध्ये हा घटक निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी युवासेना जिल्हाध्यक्ष साईराज पाटील, उपजिल्हाप्रमुख समीर सागर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र (राजू) माच्छी, सुनील इभाड, हेमंत धर्ममेहेर, डॉ. आदित्य अहिरे, रमेश पाटील, रुपजी कोल, कल्पेश भावर, मिलिंद मावळे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




Post a Comment
0 Comments