कासा–सायवन–उधवा रस्ता क्रमांक ७३ प्रकल्पात अनियमितता; भारतीय अस्मिता पक्षाची चौकशीची मागणी
डहाणू : कासा–सायवन–उधवा या रस्ता क्रमांक ७३ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट कॉंक्रीटीकरण व रुंदीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप भारतीय अस्मिता पक्षाने केला आहे. या संदर्भात पक्षाचे पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड यांनी डहाणू तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना २८ ऑक्टोबर २०२५ रोजी लेखी तक्रार सादर केली असून, प्रकल्पातील सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
वांगड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आर डी एस प्रोजेक्ट आणि सुरेंद्र इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपन्यांकडून रस्त्याचे बांधकाम सुरू असून, त्यांनी आवश्यक पर्यावरणीय परवानग्या न घेता काही कामे सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बांधकाम स्थळांवरील सुरक्षा रक्षक व मजूर हे ओळखपत्रविना आणि पोलिस पडताळणीशिवाय कार्यरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायती आणि कासा पोलिसांनी या कामगारांची ओळख व नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत पुढे नमूद आहे की, या प्रकल्पासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी (विशेषतः पेसा कायद्यात येणाऱ्या पंचायतांनी) दिलेल्या परवानग्या आणि ठरावांची पडताळणी करण्यात यावी. तसेच, ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींवर हा प्रकल्प होत आहे, त्यांचे सर्वेक्षण करून जमीन तपशीलासह यादी जाहीर करावी, अशीही मागणी केली आहे.
वांगड यांनी म्हटले आहे की, भू-संपादन कायदा २०१३ नुसार सर्व प्रभावित शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि ज्यांनी संमती दिलेली नाही त्यांचे हक्क अबाधित ठेवावेत. अन्यथा स्थानिक आदिवासी व भूमिपुत्र शेतकरी आमरण उपोषण, रास्तारोको आंदोलन आणि मोर्चा काढण्यास बाध्य होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, जिल्हाधिकारी पालघर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तसेच संबंधित कंपन्यांच्या संचालकांना पाठविण्यात आली आहे. भारतीय अस्मिता पक्षाने या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून स्थानिक आदिवासी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.





Post a Comment
0 Comments