Type Here to Get Search Results !

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रेमी कंपनीत भीषण स्फोट; दोन कामगार गंभीर भाजले

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रेमी कंपनीत भीषण स्फोट; दोन कामगार गंभीर भाजले


राष्ट्रीय पँथर्स आघाडीची सखोल चौकशी व पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी





पालघर : शिवप्रसाद कांबळे


तारापूर-बोईसर औद्योगिक क्षेत्रातील रेमी ग्रुप ऑफ कंपनीज (प्लॉट क्र. N-211/1) येथे मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी सुमारे ०३.४० वा. सुमारास झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगार गंभीररीत्या भाजले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालनालय, पालघर यांच्याकडे राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी संघटनेच्या प्रतिनिधींनी पत्र सादर करून या घटनेची सखोल चौकशी करून पीडित कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.


रेमी ग्रुप ऑफ कंपनीजच्या झालेल्या स्फोटात अतिक खान आणि वसीम सलमानी हे दोघे कामगार ५० ते ६० टक्के भाजले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक उपचारासाठी त्यांना बोईसर येथील शगुन हॉस्पिटल आणि साईली हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, वसीम सलमानी यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वापी येथील सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने एसी दुरुस्तीचे काम ‘ॲडव्हान्स कुलिंग एजन्सी’ या ठेकेदार संस्थेला दिले होते. इलेक्ट्रिकल एसी पॅनलमधील कॉम्प्रेसर बदलण्याचे काम सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि दोन्ही कामगार गंभीर भाजले. कंपनीचे सुरक्षा अधिकारी बी. पी. सिंग यांनी “एसी सर्विसिंगदरम्यान गॅसचे प्रमाण जास्त झाल्यामुळे स्फोट झाला” असे स्पष्टीकरण दिले. परंतु, काही साक्षीदार आणि सहकारी कामगारांनी “कामगारांकडे आवश्यक सुरक्षा साधनांची व प्रशिक्षणाची कमतरता होती” असे सांगितले आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेला अतिक खान हा पाच वर्षांचा अनुभव असलेला कुशल कामगार असून, कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षिततेकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याचे या घटनेतून स्पष्ट होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य नियमांनुसार ठेकेदार पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनाही अपघातप्रसंगी नुकसानभरपाई देणे बंधनकारक असतानाही, कंपनीने अद्याप कोणतीही आर्थिक मदत केली नसल्याची माहिती अतिक खान यांच्या नातेवाईकांनी दिली.


या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पँथर्स आघाडीने प्रशासनाकडे सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची, दोन्ही कामगारांना पूर्ण बरे होईपर्यंत उपचारासाठी सर्व प्रकारची आर्थिक मदत देण्याची तसेच झालेल्या शारीरिक आणि आर्थिक नुकसानीची संपूर्ण भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, संघटनेने स्पष्ट केले की, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सुरक्षितता ही केवळ कंपनीची जबाबदारी नसून प्रशासनाचीही तितकीच आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांनी प्रशासनाने जागे होण्याची आणि जबाबदार कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आल्याचे संघटनेने नमूद केले. या वेळी संघटनेचे सर्वेसर्वा अविश राऊत, कोषाध्यक्ष भरत महाले, सहसचिव लहानु डोबा, राष्ट्रीय सदस्य व जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा विद्याताई जाधव, जिल्हा समन्वयक उमेश कापसे, सदस्य निलेश गायकवाड, तालुका अध्यक्ष किशोर राऊत, मुख्य सल्लागार अहमद खान, दिनकर वानखेडे, मोखाडा तालुका अध्यक्ष चंद्रकांत पवार, कार्याध्यक्ष लक्ष्मण खुताडे, उपाध्यक्ष अर्जुन बशिरे, महिला आघाडी उपाध्यक्षा शालिनी वानखेडे तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 



Post a Comment

0 Comments