Type Here to Get Search Results !

विक्रमगडमध्ये प्रशासनाविरोधात जनआक्रोश; मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचा तहसील कार्यालयावर मोर्चा

विक्रमगडमध्ये प्रशासनाविरोधात जनआक्रोश; मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचा तहसील कार्यालयावर मोर्चा



विक्रमगड  : विक्रमगड तालुक्यातील प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने सोमवारी दणदणीत आक्रमक मोर्चा काढत तहसीलदार कार्यालयावर झंझावाती हल्ला चढवला. हजारोंच्या संख्येने शेतकरी, कष्टकरी आणि आदिवासी बांधव लाल झेंडे हातात घेऊन तुफान घोषणा देत तहसील कार्यालयावर धडकले. “ओला दुष्काळ जाहीर करा”, “भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा द्या”, “शेतीमालाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे” अशा घोषणांनी विक्रमगडचा परिसर दणाणून गेला.



नगरपंचायतीसमोरून दुपारी एक वाजता सुरू झालेला मोर्चा शिस्तबद्ध असला तरी प्रचंड तीव्रतेचा होता. प्रशासनावर रोष व्यक्त करत नेत्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या देऊन अधिकाऱ्यांना थेट इशारा दिला की, शेतकरी आणि आदिवासींच्या न्याय्य मागण्या पायदळी तुडवणाऱ्या अधिकाऱ्यांना आता जनतेच्या कोपाचा सामना करावा लागेल. सुमारे चार तास तहसील कार्यालयाला वेढा देण्यात आला. मोर्चात शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या नुकसानीची भरपाई, ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी, आदिवासी भागांतील वीज व रस्त्यांच्या समस्यांचे निराकरण, जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचारावर कारवाई, रास्त धान्य दुकानदारांवरील नियंत्रण आणि रोजगार हमी योजनेची तात्काळ अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या.



मोर्चा शांततेत पार पडला असला तरी त्यातील जनतेचा संताप स्पष्टपणे जाणवत होता. प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती पेट घेईल आणि तलवारीसारखा धारदार जनआक्रोश उसळेल, असा स्पष्ट इशारा पक्षाच्या नेत्यांनी दिला. विक्रमगडच्या रस्त्यांवरून उमटलेल्या या घोषणांनी प्रशासनाचे कान ठणकावले असून, येत्या काही दिवसांत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे विक्रमगड तालुका सचिव कॉ. काशीनाथ कोकेरा, सहसचिव कॉ. प्रकाश भोईर, कॉ. मिलका वरठे, कॉ. बंदेस वरठा, कॉ. रमेश धींडा आणि जिल्हा सहसचिव कॉ. शेरू वाघ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.




Post a Comment

0 Comments