Type Here to Get Search Results !

गंजाडमध्ये सर्पमित्रांची धाडसी कामगिरी; भला मोठा अजगर सुरक्षित पकडून वनविभागाच्या ताब्यात

गंजाडमध्ये सर्पमित्रांची धाडसी कामगिरी; भला मोठा अजगर सुरक्षित पकडून वनविभागाच्या ताब्यात



डहाणू, दि. ०३ नोव्हेंबर – डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मणिपूर लाखनपाडा परिसरात रविवारी दुपारी सुमारे १० फूट लांब आणि ३० ते ३५ किलो वजनाचा भला मोठा अजगर सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सर्पमित्रांनी तत्परतेने धाव घेऊन हा अजगर सुरक्षितरित्या पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला.



शनिवारी मध्यरात्री धर्मा भुरकुड यांच्या घरात हा अजगर शिरला असल्याचा अंदाज आहे. रात्रीच्या अंधारात घरात घुसलेल्या या अजगराने घरातील कोंबड्यांवर ताव मारला. सकाळी घरमालकांना कोंबड्या गायब झाल्याचे लक्षात आले आणि घराच्या एका कोपऱ्यातून हालचालीचा आवाज ऐकू आल्याने त्यांनी तात्काळ परिस्थिती ओळखली. त्यांनी कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवून गंजाड येथील सर्पमित्र जानी वरठा यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच जानी वरठा, ग्रामपंचायत सदस्य अरविंद लाखन आणि ग्रामस्थ अनिल वायेडा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोध घेतल्यानंतर अजगर कोंबड्या खाऊन सुस्त अवस्थेत दिसून आला. सर्पमित्रांनी काळजीपूर्वक त्याला जखमी न करता पकडण्यात यश मिळवले. घटनेमुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते, पण अजगर सुरक्षितरित्या पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वनरक्षक एस. कोळी आणि संतोष भुयाळ यांनी घटनास्थळी येऊन अजगर ताब्यात घेतला. वनविभागाच्या माहितीनुसार अजगराला आवश्यक कार्यवाहीनंतर पुन्हा जंगलात सुरक्षित सोडण्यात येणार आहे. 



सर्पमित्र जानी वरठा यांनी सांगितले की, गंजाड परिसरात त्यांनी आतापर्यंत १० ते १२ अजगर पकडले आहेत. जंगल आणि शेतांच्या सान्निध्यात असल्याने येथे सर्पांचे वास्तव्य नैसर्गिक आहे. नागरिकांनी घाबरून न जाता अशा घटना घडल्यास सर्पमित्र अथवा वनविभागाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले. वनविभाग आणि सर्पमित्रांनी नागरिकांना सूचना दिल्या आहेत की, रात्रीच्या वेळी आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, कोंबडीघर झाकून ठेवावे आणि जंगलाच्या दिशेने अनावश्यक वावर टाळावा.

Post a Comment

0 Comments