डहाणू-चारोटी मार्गावर बल्करचा भीषण अपघात, बल्कर नदीत कोसळला; चालक गंभीर जखमी
डहाणू : डहाणू-चारोटी राज्य मार्गावर सोमवारी सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अदाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून राख वाहून नेणारा बल्कर वधना नदीचा कठडा तोडत थेट नदीत कोसळला. ब्रेक निकामी झाल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान ठेवून उडी मारली, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. परंतु, तो गंभीर जखमी झाला आहे. आणखी दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. स्थानिकांनी तात्काळ मदत करून चालकाला डहाणू ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डहाणू पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन तपास सुरू केला आहे.
डहाणू-चारोटी मार्गावर अवजड वाहनांची वाढती वर्दळ आणि रस्त्यांची झीज यात या प्रकारच्या अपघातांची शक्यता वाढली आहे. स्थानिकांनी रस्त्यावर अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची आणि वाहतूक विभागाकडून कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. या अपघातामुळे रस्ते सुरक्षा उपाययोजनांवर तातडीने लक्ष देण्याची गरज उभी राहिली आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने त्वरित आवश्यक ती पावले उचलून रस्ते सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे.




Post a Comment
0 Comments