Type Here to Get Search Results !

दापचरी परिसरात वन विभागाची धडक कारवाई : दीड लाखांचा अवैध खैर लाकूडसाठा जप्त

दापचरी परिसरात वन विभागाची धडक कारवाई; दीड लाखांचा अवैध खैर लाकूडसाठा जप्त


गुप्त माहितीच्या आधारे उधवा व धानिवरी पथकांची संयुक्त मोहीम – अवैध वृक्षतोडीच्या टोळ्यांमध्ये खळबळ – वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी परिणामकारक पाऊल



डहाणू : डहाणू वनपरिक्षेत्रातील उधवा व धानिवरी वनपथकांनी गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या संयुक्त कारवाईत दापचरी परिसरातून सुमारे दीड लाख रुपयांचा खैर जातीचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला आहे. मुंबई–अहमदाबाद महामार्गालगत दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळ ही धडक कारवाई करण्यात आली असून, वन विभागाच्या या तात्काळ कृतीमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.



डहाणू वनपरिक्षेत्रात काही दिवसांपासून खैर जातीच्या झाडांची चोरी आणि बेकायदेशीर तोड सुरू असल्याची माहिती विभागाला मिळत होती. खैर हे लाकूड औद्योगिक वापरासाठी आणि कत्था उत्पादनासाठी अत्यंत मौल्यवान असल्याने त्याची अवैध तोड वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिलोंडा वनपाल योगेश कुलकर्णी आणि धानिवरी वनपाल विजय पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दापचरी परिसरात गुप्त कारवाईचे नियोजन करण्यात आले. या माहितीची खातरजमा करण्यासाठी वन विभागाने रविवारी सापळा रचला. सर्च ऑपरेशनदरम्यान अधिकाऱ्यांना दापचरी दुग्ध प्रकल्पाजवळ झाडीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूडाचे ओंडके साठवलेले दिसले. तपासात समजले की हा संपूर्ण साठा खैर जातीच्या झाडांचा असून तो अवैधपणे तोडून येथे लपवून ठेवण्यात आला होता. या साठ्याचे प्रमाण सुमारे तीन पिकअप वाहनांच्या क्षमतेइतके असून, अंदाजे बाजारमूल्य दीड लाख रुपये इतके आहे.



सदर कारवाई दरम्यान संपूर्ण लाकूडसाठा वन विभागाने ताब्यात घेऊन डहाणू वनपरिक्षेत्रातील कासा येथील शासकीय काष्ठविक्री आगार (भराड) येथे जमा केला आहे. विभागाने तातडीने पंचनामा करून या घटनेबाबत गुन्हा नोंदवला आहे. सध्या या अवैध साठ्यामागील सूत्रधार, वाहतूक मार्ग आणि खरेदीदार यांचा शोध वन विभाग घेत आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांचाही सहकार्याने तपास सुरू आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सागर आरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनसंपत्तीचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. खैर जातीची अवैध तोड थांबवण्यासाठी विभागाने गुप्त माहिती प्रणाली मजबूत केली आहे. या प्रकरणातील दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू राहतील. अशी प्रतिक्रिया वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. 



या मोहिमेत वनपाल विजय पाटील, योगेश कुलकर्णी, विक्रांत सोनावणे (मोडगाव) तसेच वनरक्षक संजू भुसारा, सुनील पवार, प्रवीण वाडू, दिनेश वाडू, किरण विल्हात, गुरुनाथ गांगोडे, राजेश बोबा, भिवा दळवी, लक्षी गोरखाना, लक्ष्मण थोरात, बंधु पऱ्हाड, लक्ष्मण दळवी, कान्हा वेडगा आणि राजेश घरत यांनी सक्रिय सहभाग घेतला. पथकाने उशिरापर्यंत परिसराची पाहणी करून लाकूड साठ्याची सुरक्षित वाहतूक केली. या कारवाईमुळे दापचरी परिसरातील अवैध खैर तोडीच्या कारवायांना मोठा आळा बसणार असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments