घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात पालघर पोलिसांना यश
पालघर : पालघर शहरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीचा तपास अवघ्या काही तासांत उघड करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक सराईत चोरटा गजाआड केला आहे. फिर्यादी मनोज अशोक कापडीया यांच्या शेवंती अपार्टमेंटमधील घरातून तब्बल ₹९२,००० किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून फरार झालेल्या चोरट्याला पालघर पोलिसांनी तत्परतेने आणि कार्यकौशल्याने गजाआड केल्याने पालघर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शुक्रवार, १७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कापडीया दांपत्य घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील लॉकर फोडून सोन्याचे मंगळसूत्र, चैन व हार असा एकूण ₹९२,००० किंमतीचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २६७/२०२५ भा.दं.सं. (बी.एन.एस.) कलम ३०५(अ), ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक गठित करण्यात आले. पथकाने घटनास्थळी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढला. अखेर ५८ वर्षीय निलेश अंकुश काळे राहणार विरार पूर्व व मुळ राहणार देहुरोड, पुणे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पालघर व्यतिरिक्त वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीचीही कबुली दिली. आरोपी काळे हा पोलिसांच्या नोंदीतील सराईत घरफोड्या करणारा असून त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा आणि मुंबई परिसरात तब्बल ३४ गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. सदर आरोपीस अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पो.ह.वा. चंद्रकांत सुरुम हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
सरची कारवाई पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रदीप पाटील, पोउनि. स्वप्नील सावंतदेसाई, पो.ह.वा. संतोष निकोळे, संदीप सरदार, भगवान आव्हाड, राकेश पाटील, पो.अ.मं. विशाल लोहार, विशाल कडव, वैभव जामदार (स्थानिक गुन्हे शाखा, पालघर) तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पो.ना. भूषण वाघमारे, पो.अ.मं. रुपेश पाटील आणि सीसीटीएनएसच्या मपो.अ.मं. राखी मेस्त्री यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडली.


Post a Comment
0 Comments