अंमली पदार्थ विक्रेत्यावर तलासरी व घोलवड पोलिसांची संयुक्त कारवाई ; १२ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त
डहाणू : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती मिळत असताना तलासरी आणि घोलवड पोलिसांनी गुरवार,०६ नोव्हेंबर रोजी रात्री १२:०५ च्या दरम्यान संयुक्त कारवाई करून एका चरस विक्रेत्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात चरस, मोटारसायकल आणि मोबाईल फोनचा समावेश आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील चिखला बीच परिसरात एक इसम चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती तलासरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दोन्ही ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तरीत्या सापळा रचला आणि गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास संशयिताला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव सायमन वळवी (वय ४०,कैनाड कडुपाडा) असे असून तो काळ्या रंगाच्या सीबी शाईन (एमएच ४८ एडी २४५६) या दुचाकीवरून आला होता. त्याच्या मोटारसायकलच्या हँडलला लटकवलेल्या पिशवीतून पोलिसांनी ६०० ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ जप्त केला. या प्रकरणी घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४४/२०२५ असा एनडीपीएस कायद्यान्वये कलम ८ (क), २० (ब) (TT) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील तपास घोलवड पोलिस ठाण्याचे सपोनि साहेबराव कचरे करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि अजय गोरड, घोलवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि साहेबराव कचरे, पोउपनि विकास दरगुडे, सफौ हिरामण खोटरे, पोअं. योगेश मुंडे तसेच पोउपनि परमेश्वर जाधव, सफौ अविनाश पाटील, पोहवा जितेश घाटाळ, पोहवा कोठारी, पोहवा किणी, पोहवा राजेश धारणे आणि पोशि मेस्त्री यांनी संयुक्तरीत्या ही यशस्वी कारवाई पार पाडली.


Post a Comment
0 Comments