पालघरच्या आदिवासी कलाकारांचा नागपूरच्या ‘ट्रायबल फॅशन शो’मध्ये डंका - परंपरा, कला आणि संस्कृतीचा जलवा
डहाणू : नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या ‘ट्रायबल फॅशन शो’मध्ये पालघर जिल्ह्यातील आदिवासी कलाकारांनी आपल्या अद्वितीय प्रतिभेच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या भव्य सोहळ्यात पालघरच्या तरुणांनी केवळ पारितोषिकेच पटकावली नाहीत, तर आदिवासी परंपरेचा गौरवशाली ठसा उमटवला. या स्पर्धेत रवी सातपुते याने प्रभावी सादरीकरण करून पहिला ‘मिस्टर नागपूर’ हा मानाचा किताब आपल्या नावावर केला, तर किरण वरठा याने ‘सेकंड रनर अप’ ठरत तिसरा क्रमांक पटकावला. नृत्य विभागात लक्ष्मी सातवी आणि पायल वरठे यांनी सादर केलेल्या पारंपरिक तारपा नृत्याने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या या सादरीकरणाला प्रथम पारितोषिकाचा मान मिळाला.
या कार्यक्रमाचे आयोजन जय सेवा नागपूर संस्थेचे प्रफुल धुर्वे यांनी २ नोव्हेंबर रोजी केले होते. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, आणि गडचिरोलीसारख्या राज्यांतील ४५ हून अधिक आदिवासी जमातींचे कलाकार या रंगीबेरंगी सोहळ्यात सहभागी झाले होते. मंचावर प्रत्येक कलाकाराने आपल्या संस्कृतीचे, वेशभूषेचे आणि परंपरेचे दैदिप्यमान दर्शन घडवले. छत्तीसगड आणि बस्तरमधील कलाकारांनी पारंपरिक ढोल-वादन आणि नृत्य सादरीकरणाने वातावरण भारावून टाकले.
पालघर जिल्ह्यातून रवी सातपुते, किरण वरठा, पायल वरठे, लक्ष्मी सातवी, तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नितीन दिवा आणि आकाश दांडेकर यांनी सहभाग घेतला होता. या सर्व कलाकारांनी केवळ रंगमंचावरच नव्हे, तर यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामसारख्या माध्यमांद्वारेही आदिवासी संस्कृतीचा प्रचार करत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे दालन खुले केले आहे. पालघरच्या या नव्या पिढीने पारंपरिक तारपा वाद्य आणि नृत्यकलेच्या माध्यमातून केवळ राज्यस्तरावरच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या सर्जनशील कार्यामुळे आज अनेक तरुण आदिवासी युवक-युवती प्रेरित होत आहेत. या यशस्वी सादरीकरणामुळे पालघरच्या कलाकारांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरा या केवळ इतिहासाचा भाग नाहीत, तर त्या आजही जिवंत, प्रेरणादायी आणि आत्मगौरवाने भरलेल्या आहेत. नागपूरमधील या मंचावर त्यांनी सादर केलेली कला म्हणजे केवळ स्पर्धा नव्हे, तर आदिवासी अस्मितेचा उत्सव होता.
▶️ हे यश आमच्या संस्कृतीवरील श्रद्धा आणि मेहनतीचे फळ आहे. आमची संस्कृती, कला आणि परंपरा जिवंत ठेवणे ही आमच्यासाठी जबाबदारी आहे. आधुनिक माध्यमांच्या मदतीने आम्ही आमची संस्कृती जगभर पोहोचवत आहोत.
--- रवी सातपुते, मिस्टर नागपूर विजेता






Post a Comment
0 Comments