जामशेत (वसंतवाडी) येथे आमदार विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
डहाणू : जिल्हा परिषद पालघर कृषी विभाग आणि पंचायत समिती डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी डहाणू तालुक्यातील जामशेत (वसंतवाडी) येथे भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, विविध शासकीय योजना तसेच नैसर्गिक शेतीविषयक माहिती देण्यात आली. कार्यक्रमाला डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, जिल्हा कृषी अधिकारी, डहाणूतालुका कृषी अधिकारी, सरपंच विकास दौडा तसेच ग्रामसेवक आणि परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार विनोद निकोले यांनी भूषविले. त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी नव्या शेती तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जिल्हा परिषद व कृषी विभाग यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजना प्रत्यक्षात राबवाव्यात असे आवाहन केले. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या शासनस्तरावर मांडून त्यावर योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रसंगी गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देताना विविध अनुदाने, पिकविमा योजना तसेच जलसंधारणाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व, पिक बदलाची गरज आणि मृदसंपदा संवर्धनाविषयी सविस्तर माहिती देऊन शेतकऱ्यांना उपयुक्त सल्ले दिले. उपस्थित शेतकऱ्यांनी कार्यक्रमादरम्यान अधिकारी व तज्ञांकडून मिळालेल्या माहितीचा लाभ घेत आपल्या शेतीमध्ये नवे प्रयोग करण्याची तयारी दर्शविली. या मेळाव्यामुळे डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नव्या संधी, तंत्रज्ञान आणि शासकीय सहाय्य याबद्दल एकत्रित माहिती मिळाली.




Post a Comment
0 Comments